'युवा चेतनाच्या' माध्यमातून कोरोना रुग्णांना मिळतोय वेळेवर उपचार,सोशल मीडियाच्या माध्यमातून सरसावली तरुणाई.
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांना वेळेवर बेड,ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,प्लाझ्मा, रक्त व औषधे यांचा तुटवडा जाणवत आहे.हि बाब लक्षात घेऊन गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बारामती तालुक्यातील 'युवा चेतना' सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी तरुणाई पुढे सरसावली आहे.
कोरोना झालेल्या एका मित्राला प्लाझ्माची गरज असताना 'युवा चेतना' सामाजिक संस्थेच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो त्वरित उपलब्ध झाला. त्यावेळी या सर्वांनी विचार केला की अशा किती जणांना दररोज मदतीची गरज असेल आणि ह्याच गोष्टीतून प्रेरणा घेत 'युवा चेतना' मधील सदस्यांनी ५ मार्चपासून कोरोना रुग्णांना मदत मिळवून द्यायला सुरु केले. रुग्ण त्यांना हवी असलेली मदत 'युवा चेतना' मधील सदस्यांकडे मागतात व त्यांना अगदी काही मिनिटांत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आवश्यक असलेली मदत पोहचवली जाते.त्यासाठी युवा चेतना मधील मनोज पवार ,केतन झगडे ,दशरथ मोठे ,ऍड रवींद्र माने, विकास सावंत,रुषी काशीद,सुरज रणदिवे,निकिता भापकर ,नूतन खेतरे, पूनम देशमुख,कादंबरी जगताप ,अंकिता चांदगुडे , प्रज्ञा काटे, गौरी गुरव,निशिगंधा जाधव आदी टीम दिवस रात्र रुग्णांसाठी काम करत आहे.
सुरुवातीला फक्त बारामतीमधील रुग्णांचे मदतीसाठी फोन येत होते. नंतर आजूबाजूच्या इंदापूर,दौंड,जेजुरी,फलटण,माळशिरस इत्यादी ठिकाणी हे मदतीचे जाळे पसरले आहे आणि त्यासोबतच पुणे,सातारा सारख्या शहरांमधून देखील अधूनमधून फोन येत असतात.
युवा चेतना मध्ये एकूण 48 सदस्य असून यांच्या माध्यमातून मागील 2 महिन्यांपासून ते आजपर्यंत युवा चेतनाच्या माध्यमातून 2000 पेक्षा जास्त बेड तसेच 745 पेक्षा जास्त प्लाझ्मा युवा चेतनाच्या माध्यमातून लोकांना मिळवून दिले आहेत.त्याच्या या कामाचे बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून कौतुक केले असून शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनीदेखील कौतुक करून शुभेच्छा दिल्या.