वाल्हे येथील भैरवनाथ देवाची यात्रा कोरोनामुळे रद्द
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे गावात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे.परंतु यात्रा रद्द झाली असली तरी येत्या २ मे रोजी भैरवनाथ मंदिरात भव्य रक्तदान महायज्ञ शिबीर आयोजित करून समाजाप्रती अनोखा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव शशिकांत दाते यांनी दिली.
यावेळी श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेची परंपरा खंडित होऊ नये यासाठी शासन नियमांचे पालन करत मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी ( १ मे ) कुंभारवाडा येथुन देवाचे प्रस्थान होऊन देव देवळात येणार आहेत तर रविवारी ( २ मे ) देवाला मुंढवळी व पोशाख चढवून पारंपारिक पद्धतीने देवाच्या हळदीचा कार्यक्रम व रक्तदान शिबीर तर सोमवारी (३ मे ) रोजी श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा साय.५.३०च्या दरम्यान साधेपणात व मोजक्या लोकांमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती देवाचे पुजारी सचिन आगलावे यांनी दिली .यावेळी भाविकांना हा लग्न सोहळा ऑनलाईन पाहता येणार असल्याने श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात कुणीही गर्दी करू नये असे आवाहन वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अमोल खवले यांनी केले.
******************************************
देवाच्या हळदी दिवशी मंदिराच्या प्रांगणात श्री भैरवनाथ रक्तदान महायज्ञ शिबीर आयोजित करून रक्तदात्यांना अनोखी भेट दिली जाणार असल्याचे माजी सभापती गिरीश पवार यांसह सचिन लंबाते संदेश पवार प्रा.सचिन दुर्गाडे हभप.अशोक महाराज पवार तसेच नाना दाते मित्र परिवाराकडून सांगण्यात आले आहे.